Friday, December 8, 2023

मोरगिरी किल्ला पदभ्रमण भाग १

मोरगिरी किल्ला पदभ्रमण
भाग १ :-


खूप दिवसात चांगला ग्रुप मिळत नव्हता. ह्या आधी ओंकार बरोबर जायचो पण नंतर ते पण कमी झालं. खूप जणांचे फेसबूक वर पोस्ट पाहत असायचो, त्रास व्हायचा ते पाहून. शेवटी एकदिवस तुषार भेटला. गप्पा झाल्या, बोलता बोलता मी त्याला म्हणलो पण अरे कुठे जात असल्यास मला पण संग, कोणता ग्रुप असेल तर मला पण आवडेल जॉईन व्हायला. त्यांनी प्रशांत दादा बरोबर बोलायला सांगितलं. मी दादा बरोबर बोललो, त्यांनी लगेच मला एका ट्रेक च्या ग्रुप मध्ये घेतलं. तो ग्रुप होता मोरागिरी किल्ल्याचा. 

०९/०२/२०२० रोजी मोरागिरी किल्ल्यावर जाण्यासाठी टीम तयार झाली. ०९ तारखेला किती वाजता निघायचे हे पण ठरले, कोण कुठून, कोणाबरोबर येणार आणि नक्की सगळ्यांनी जमायचं कुठे अगदी सगळ ठरल. माझ्यासाठी प्रशांत कोठावदे ह्यानाच मी ओळखत होतो आणि बाकीचे नवीनच होते. कोणत्या पण ट्रेक ची एक खासियत अशी असते की तुम्ही नवीन नवीन ओळखी वाढवता, त्या ओळखी तुम्हाला आयुष्यभर जपता आल्या पाहिजेत. 

प्रशांत दादानी सांगितल्या प्रमाणे मी आणि विजय गुर्जर दोघे एकत्र ठरलेल्या मीटिंग पॉइंट ला पोचलो. सगळ्या नवीन लोकांची माझी ओळख झाली ( म्हणजे माझ्या साठी नवीन ). सगळे बरोबर ०५:३० वाजता निघालो. गप्पा गोष्टी करत करत कोणत्या रूट नी जायचं ते फायनल झाले. 

तसे मोरगिरी कडे जायला पुण्याहून २ मार्गांनी जाता येते. 
१) पुण्यातून पौड मार्गे - लवळे - हाडशी - जवाण पासून डाव्या . हाताला वळून सरळ मोरवे. 
२) पुण्यातून एक्स्प्रेस रस्त्याने लोणावळा - अँबी व्हॅली - पुढे जवण तुंगी रोड मार्गे मोरवे.

नोट : तुम्ही जवाण - तुंगी रोड वर आल्यावर तुम्हाला पटकन समजत नाही कुठे आपल्याला गाड्या लाऊन किल्ल्यावर चढाई चालू करायची आहे. तुम्ही गूगल मॅप चालू ठेवा, त्यावर किल्ल्या च्या जवळ आल्यावर ब्रम्हा हेवन नावाची जागा दिसते, त्याचा पुढेच एक रस्ता उजव्या हाताला जातो. त्या रस्त्यावरून पुढे जा. तुम्हाला तो रस्ता एका घरा पशी घेऊन जातो. तिथे आपल्या गाड्या लावा. गडाची पाऊलवाट तिथूनच चालू होते. काही अडल्यास तिथे मदत मिळू शकेल. 

बसेकँप गूगल मॅप लिंक
https://maps.app.goo.gl/y9R43NRq7rYRWvok9

आम्ही गप्पा मारत न्याहारी साठी लोणावळ्यात आलो. रामकृष्ण हॉटेलच्या दारात आम्ही पहिलेच. ते उघडे पर्यंत जरा पाय मोकळे केले आणि गार वाऱ्याचा आनंद घेतला. तेवढ्यात हॉटेल उघडले. आत जाऊन नाष्ट्यावर आडवा हात मारला. परत पुढच्या प्रवासाला निघालो. गुगल मॅप चालूच होता. विजय गुर्जर मॅप पाहून रस्ता सांगत होता. आम्ही अँबी व्हॅलीच्या पुढे तुंगी रोड मार्गे मोरवे दिशेने येताना अचानक मोरगिरीची पाटी लागली. ते गाव जांभुळणे, मित्रांनो कृपया करून ह्या मार्गाने चढाई चालू करू नका. कारण ह्या मार्गावर घासरा ( Skree), जास्त आहे म्हणून हा रस्ता खूप धोकादायक आहे. 

आमचे २ अजून साथीदार प्रभुराज आणि अनुराग दोघे बाईक वर आधीच पुढे आलेले. आम्ही आणि हे दोघे गडाच्या जवळपास भेटलो. गडावर जायचा रस्ता नक्की कुठून चालू होतो ह्याचा अंदाज मिळत नव्हता. आमचे बाईक वराचे साथीदार असे काही रस्ता शोधण्या साठी पायपीट करत होते की जसे ते गवाकरीच असावेत इथले,असच वाटावे. शेवटी विजय नी कोणाला तरी फोन वर विचारपूस केली आणि आम्हाला शेवटी रस्ता मिळाला. 

आम्ही वर नमूद करून दिलेल्या नोट मध्ये जी जागा आहे तिथे पोचलो. तिथून देवघर डोंगर आणि तुंग किल्ला ह्याचे सुंदर दर्शन झाले. ह्याच जागेवरून मोरगिरी चे पण कमालीचे दर्शन होते. आम्ही सगळेच पहिल्यांदा मोरगिरी वर जाणार होतो. आमच्या अंदाजा प्रमाणे किल्ला खूपच उंचीवर होता. मी जो गूगल वर फोटो पाहिले होते त्याच्या तुलनेने गड बराच उंचीवर होता. सहसा टेहेळणी साठी वापरणारा किल्ला जास्त उंचीवर नसतो आणि सोप्पा पण असतो. पण ह्या वेळेस सगळीच गणितं चुकली होती. 

क्रमशः
बासेकँप वरून दिसणारा सुंदर नजारा