एक अनोखा रेंज ट्रेक
रेंज ट्रेक म्हणजे आपण डोंगराच्या किंवा गडाच्या वरच्या बाजूने उतरून परत दुसऱ्या डोंगराच्या वरच्या ठिकाणी जायचे, असच परत करायचे ह्याला रेंज ट्रेक म्हणतात. नाहीतर सहसा आपण पायथ्यापासून गडावर जातो. एक अनोखा रेंज ट्रेक विजय गुर्जर ह्यांनी ह्या वेळेस तयार केला. ह्यात आम्ही घाटवाटा, किल्ला, पठार आणि जंगल असा संमिश्र रूट तयार केला होता. नेहमीप्रमाणेच कामाला लागलो. बघता बघता टीम तयार झालीच. आम्ही एकूण ११ जण होतो. विजय गुर्जर हा ह्या ट्रेकचा लीडर होता. त्यांनी सगळी सोय व्यवस्थित केली होती. प्रत्येकाला काय काय जवळ घ्यायचय ह्याची एक छोटीशी लिस्ट त्यांनी एका केलेल्या ग्रुप मध्ये पाठवली. त्याप्रमाणे सगळे आपापल्या कामाला लागले. बघता बघता जायचा दिवस जवळ आला. आईने घरी नेहमी प्रमाणे चटणी सँडविचची तयारी करून ठेवलेली. रात्री जरा कामांच्या मुळे धावपळ झाली त्यामुळे झोपायला उशीर झालाच.
सकाळी लवकर उठून बॅकपॅक भरली. एकीकडे आई मस्त थेपले आणि चटणी सँडविच बनवत होती. आवरता आवरता जरा उशीर झाला. सगळे येऊन थांबलेच होते माझी वाट पाहत. ह्या वेळेस काही नवीन आणि काही आधी भेटलेली मंडळी होती. ट्रेकची एक खासियत आहे, नवीन नवीन लोकांच्या ओळखी होतात, प्रदेश पाहिले जातात, आपल्या आजूबाजला कसा प्रदेश आहे आणि कोणत्या दिशेला कोणता किल्ला किंवा घाटवाट आहे, तिथले लोक कसे राहतात, उपजीविकेचे त्यांचे साधन काय?, त्यांचा समस्या आणि जगण्यातले अडथळे, राहणीमान अश्या आणि ह्याहून जास्ती गोष्टी एका ट्रेक मुळे समजतात.
आम्ही २ गाड्यांमध्ये मिळून ११ जण होतो. माझ्या गाडीत मी, तुषार कोठावदे, चिन्मय कीर्तने, हर्षल कुलकर्णी, सिद्धू पाटील, सारंग ढेरे आणि दुसऱ्या गाडीत प्रशांत कोठावदे, विजय गुर्जर, समीर कदम, यल्लालिंग महादेव शेजाळे (YMS) आणि प्रसाद देसाई. आमच्या गाडीत जाताना खूप विषयांवर बोलणं झालं गार्मेन वॉच वर आणि त्याच्या टेक्नॉलॉजी वर खूप माहिती सारंगला माहीत होती आणि ती माहिती तो सिद्धूला सांगत होता आणि आमचे पण ज्ञान वाढवत होता. ह्यातून खरच समजले की ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीची माहिती असणं किती महत्वाचे आहे. ह्यातून आपण आपला जीव पण वाचवू शकतो, आपण रस्ता चुकलो तर तेच घड्याळ आपल्याला परत विशिष्ट जागी परत पण घेऊन यायला मदत करते. मग, प्रत्येकानी आपापले ट्रेकचे अनुभव, त्यातल्या मजा एकमेकांना सांगायला सुरावत केली. ह्या सर्वांचा मला असा फायदा होता कारण माझा ज्ञानात खूप भर पडत होती. गप्पा गोष्टी करत करत आम्ही न्याहारी करण्या साठी थांबलो. ११ बकासुर खाणार म्हणजे ….पोटात ढकलून लगबगीने पुढच्या प्रवासाला लागलो. सिद्धू आणि हर्षल दोघे सायकल वीर पण आहेत ते महाबळेश्वरच्या घाटात जे सायकलस्वार होते त्यांचा सायकल पाहून डोळे मोठे करून आमचं ज्ञान वाढवत होते.
थोड्याच वेळात आम्ही केट्स पॉइंट वर पोचलो. सगळे जण उतरले. तुषार दादा, विजय, प्रशांत दादा गड्या घेऊन श्री क्षेत्र महाबळेश्वरच्या इथे गाडी पार्क करायला गेले. कारण जिथं आमचा ट्रेक संपेल तिथे एक गाडी असणे गरजेचे होते. आमचा रुट भन्नाट होता. आम्ही केट्स पॉइंट पासून उतरणार होतो, तिथून आम्ही परतवडी, नांदगणे इथून कमळगडवर जाणार होतो, गडाच्या खाली सामान ठेऊन गडाची भ्रमंती, खाली येऊन मुक्काम, मग सकाळी उठून कोळेश्र्वर, इथूनच जोर आणि जोर मधून गणेश घट चढून श्री क्षेत्र महाळेश्वर असा सगळा मोठा फेरफटका होता.
मी आणि सारंग दोघे केट्स पॉईंट वरून सर्व मार्ग कसा असू शकतो ह्याचा अंदाज लावला. एका दुर्बीण वाल्यांनी कमळगडावराचा भगवा दुर्बिणीने दाखवला. फिरत फिरत जात असताना हर्षल कुठेतरी ३-४ पोरांच्या बरोबर काहीतरी पाहताना दिसला. जवळ जाऊन पाहतो तर फुरसे सापाचे पिल्लू. अतिशय विषारी साप. आम्ही फोटो काढायच्या नादात. एवढ्यात गाडी लाऊन बाकीचे आलेच. फुरसे दिसले पाहून विजय आलाच पळत. बऱ्याच कष्टाने आम्ही फोटो काढण्यास यशस्वी झालो. शेवटी त्याला लांब सोडून लगबगीने पुढच्या प्रवासाला निघालो. पुढचे अंतर काही छोटे नव्हते. अंधार पडायच्या आत कमळगड पायथा गाठायचा होता.
क्रमशः
( पुढील भाग केट्स पॉईंट ते कमळगड प्रवासातले भन्नाट अनुभव )![]() |
| संपूर्ण रूट |



No comments:
Post a Comment