Saturday, March 28, 2020

एक अनोखा रेंज ट्रेक - भाग ३

एक अनोखा रेंज ट्रेक


भाग ३

सकाळी सगळे लवकर उठलो, फटाफट आवरून, नाश्ता करून सगळे रेडी झाले. मस्त छान सकाळच्या वातावरणात सगळ्यांनी गडाच्या समोर एक ग्रुप फोटो काढला. आम्हाला पुढे कोळेश्र्वर पठारावर जायचे होते, रस्ता पूर्ण पणे घनदाट जंगलातून असल्यामुळे पाऊलवाट माहिती पाहिजेत. आपण त्यात अडाणी पडतो, त्यामुळे तिथला माहितगार माणूस हवा. म्हणून आम्ही वाटाड्या घेतला होता. आमचे आज वाटाड्या होते बाबुराव कात्रट आजोबा, वय ७६. खरच ह्या मातीत मुरलेला माणूस. एकदम काटक, ताठ, चिवट माणूस. रस्त्याची खडान खडा माहिती, आजुबाजूच्या प्रदेशाची, घाटवटांची, डोंगरांची, किल्ल्यांची सगळी नावं त्यांना माहीत होती. 

फोटो काढून आम्ही निघालो, काल आम्ही नांदगणे गावातून वर आलो आणि जिथून आम्ही जंगलातून डाव्या हाताला वळलो आणि थोडी चढाई करून कमळगड कडे उजव्या हाताला वळलो, आता आम्हाला त्याच जागी जाऊन सरळ जायचे होते. चालायला सुरुवात केली. गोरक्षक मंदिराच्या थोडे अलीकडे उजव्या हाताला पाण्याचे टाके आहे, तिथे बाटल्या भरून घेतल्या आणि बरेच पाणी पूऊन घेतले. जरा १०-१५ मिनिटे चालून पुढे आलो आणि छोट्या चढाई नंतर आम्ही परत हळूच घनदाट मोठ्या जंगलात प्रवेश केला तेच कोळेश्र्वर पठार. जंगल अतीशय घनदाट आहे. वाटाड्या शिवाय जाऊ नये. कोणती वाट कुठे जाते पटकन समजत नाही. चुकून महाबळेश्वर कडे जाणारी वाट पकडाल आणि डावीकडे जाल, नाहीतर कोळेश्र्वर कडे न जाता भटकाल. त्यामुळे वाटाड्या हवाच.

कात्रट आजोबांना चालताना आम्ही विचारले, कोळेश्र्वर मंदीर नक्की आहे तरी कुठे ?? त्यांनी बोट दाखवून लांब दूरवर एक भाग दाखवला जो ठीपक्या सारखा छोटा दिसत होता, तिथे जायचे होते. चालता चालता मध्येच जंगल नाहीसे होयचे आणि माळरान लागायचे, कधी कमरे इतकी लहान आणि मोठी पाने असलेली झुडपाच्या अकराच्या झाडाचे रान लागायचे, एकदा तर छोट्या पांढऱ्या फुलांचे माळरान लागले, खूप सुंदर दिसत होते. आज चालायला चालू केल्या पासून आमच्या उजव्या हाताला केंजळगड आणि त्यामागे दिसणारे रायरेश्वर चे पठार होते. जसे जसे आम्ही पुढे जात होतो तसे तसे ते जवळ येत जात होते. आणि आमच्या मागे कमळगड दिसत होता आणि त्याचा घनदाट जंगलातून श्री गोरक्षक मंदिराचा इथला भगवा सुंदर दिसत होता. 

२ ते २:३० तास चालल्यावर आम्हाला कात्रट आजोबांचे छोटेसे गाव लागले, नाव केळेश्र्वर मुऱ्हा. अवघे १० घरे आणि शेती. चिल्ली पिल्ली पोरे आमच्या कडे आश्चर्याने पाहत होती. इथून मुले दररोज पठारावरून खाली वर करतात शाळे साठी. इतक्या घनदाट जंगलातून जायचे म्हणजे औरच. पावसाळ्यात किती हाल होत असतील विचार करा. तरीही मुले इतके कष्ट करतात. आश्चर्य वाटले मला फार. थोडे पुढे जाऊन पाहतो तर २-३ पाईप लईन दिसल्या. मग मामांना विचारले असता ते म्हणले एका घळीच्या इथून जीवंत पाण्याचा झऱ्याला एक खड्डा करून त्यातून पाणी पुढे गावाला पुरवले जाते. पहा किती छान युक्ती लावली आहे गावकऱ्यांनी. मी ते पाणी इतके घोट प्यायलो तरी प्यावेसे वाटत होते. जरा विश्रांती नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. 

साधारण पुढच्या तासाभरात आम्ही कोळेश्र्वर मंदीर पाशी पोचलो. मंदीर ह्या शब्दाची संकल्पना डोळ्यात ठेऊन मी गेलो तर माझाच माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना. एक दगड , त्याला तांब्याचा मुखवटा, दगडाच्या बाजूंनी दगडी चौकट, चौकटीच्या दरवाज्यावर घंटा. एका मोठी चौकोनी तटबंदी, बास . असा होता परिसर. घनदाट जंगल आहे पठारावरील. ह्या जंगलात खुरट्या झुडपात रानडुक्कर असायची मोठी शक्यता आहे. मंदिराच्या थोडे आधी तर काही झाडांवर मोठे किडे होते जे अक्षरशः सुकलेले होते. माझ्या मते ते फुलपाखरु च्या प्रजातीचे किडे असावेत. माहीत नाही, मी फोटो देईन तो पाहून मला नक्की सांगा. 

आता आम्हाला जोर च्या बाजूला जायचे होते. आम्ही कोळेश्र्वर पठार वर उजव्या बाजूला होतो आता आम्हाला पश्चिम दिशेला म्हणजे पठाराच्या महाबळेश्वर च्या बाजूला जायचे होते. म्हणजे मध्ये पायवाट बदलायची होती. इतक्या घनदाट जंगलात बरोब्बर जोर ची कोणती पायवाट हे पाहण्यासाठी माहितगार वाटाड्या पाहिजेच. आमचे वाटाड्या काका तरबेज होते. त्यांनी बरोबर वाट निवडली आणि काही वेळात जंगलातून आम्ही एका सोंडेच्या वर आलो आणि आम्हाला समोर क्षेत्र महाबळेश्वर खाली खोलवर बलकवडी धरण . आम्हाला खाली छोटेसे जोर दिसत होते. 

हळू हळू उतरायला सुरवात केली. तासाभरात खाली जोर गावात आलो. गावकऱ्यांना विचारात आम्ही  संदीप सपकाळ ह्यांच्या घरी गेलो. एका मागोमाग एक सगळे आले. उतरण खूप थकाऊ होती, आणि सकाळपासून चालल्या मुळे सगळेच थकले होते. अंदाजे सकाळपासून १२ किलोमीटर चालणे झाले असावे. इथली गावातली पोरं फारच भारी होती. सगळ्यांनी मिळून आम्हाला पाने वाढून आणली, जे जे लागतय ते दिले. सुंदर आणि चविष्ट गरमागरम झुणका भाकर आणि भात होता. जो हात मारलाय जेवणावर, नाद खुळा. खूप खाल्ले .. एक छान विश्रांती घेतली आणि पुढच्या मार्गक्रमणा निघालो. आता गणेश घाट मार्गे श्री क्षेत्र महाबळेश्वर गाठायचे होते. 

चालत चालत आम्ही  कुंभळजाई देवी मंदिर येथे पोचलो. इथून पूल ओलांडून गणेश घाट रस्त्याला लागलो. मंदिराचा इथून गणेश घाट आणि श्री क्षेत्र महाबळेश्वर फारच उंच दिसत होते. कोळेश्र्वर मंदीरच्या भागाला कोळेश्र्वर पठार म्हणतात आणि जेथे आपण जोर कडे उतरायला लागतो त्या वेळेस त्याचे नाव कोंडवळ पठार म्हणतात. हे स्थानिक रहिवाशांनी खूप जुन्या काळा पासून ठेवलेली नावे आहेत. जसा घाटवाटेचा रस्ता चालू झाला, तसे एकाएकी घनदाट जंगल आणि हळू हळू चढाई पण चालू झाली. असेच चढता चढता अंदाजे अर्ध्या तासात आम्ही बरेच वर आलो होतो. हळू हळू न थांबता एक एक पाऊल गप्पा मारत मारत टाकत होतो. आज गप्पा जास्तच रंगल्या. 

असेच मध्ये पाण्यासाठी थांबलो, मी, हर्षल, YMS आणि थोड्याच मागून तुषार दादा. पाहतो तर वरून २ लोक येत होते. त्यातला एक आम्हाला भिडला. मी नागपांती आहे वगैरे … एकंदरीत भाई घेऊन आलेले. खुशीत होते. नंतर त्यांनी तुषार दादा ला धरले, त्यांनी पण त्याला पुढे पिटाळले. मग त्यांनी चिन्मय किर्तनेला धरले. त्याचा समोर जाऊन त्यानी बोटाच्या हालचाली करून काहीतरी पुटपुटले आणि फाशश…. असा आवाज करून पुढे गेला. बिचारा थोडा घाबरला. तो तुषार दादा समोर म्हणतो काही केले का ह्यांनी मला, दादा बिचारा हसत हसत चल म्हणला पेताड आहे ते. 

जरा वर गेल्यावर आम्हाला आता माथा दिसायला लागला. तिथेच आम्ही पाण्याचे लपलेले टाके पाहिले. थोड्याच वेळात सुंदर अश्या पायऱ्या लागल्या आणि पाहतो तर आम्ही पोचलो होतो. रस्ता फारच घनदाट जंगलातून जातो. छान फोटो काढले. आता आम्ही परत महाबळेश्वर पठारावर आलेलो. घाटाच्या वरच्या बाजूला सुंदर गणेशाची मूर्ती आहे. जोर मध्ये अर्धे लोक दररोज ह्या मार्गाने उपजीविकेचे साधना साठी महाबळेश्वर वर येतात. आम्हाला तरी २ तास लागले पण लोक मात्र ४५ मिनटात येतात. सगळे येई पर्यंत छान आराम केला. सूर्य मावळतीला आलेला होता. १० - १५ मिनिटात आम्ही श्री क्षेत्र महाबळेश्वर देवळाच्या पाशी पोचले होतो. 

जी गाडी इथं लावलेली त्यात बसून आम्ही काही जण परत केट्स पॉइंट पाशी गेलो. पॉईंट चे गेट बंद होयचा आत आम्हाला पोचायचे होते. वेळेत पोचलो, ओले कपडे बदलले. मस्त चहा प्यायलो. वाटेत रसदार स्ट्रॉबेरी घेतल्या. वाई मध्ये मस्त दमदार जेवलो आणि पुढच्या २ तासात पुण्याला पोचलो. एकंदरीत खूप दिवसांनी खूप छान लोकांच्या बरोबर खूप दमदार ट्रेक केला. समाधान मिळाले.

अशीच भटकंती करायला मिळावी हीच इच्छा...


… समाप्त ...


कमळगडाच्या इथून पुढच्या प्रवासाला निघालो त्या आधी ग्रुप फोटो.

पुढच्या प्रवासाला निघालो


सुंदर असा आमचा पुढचा रस्ता.

हेच ते जिवंत झऱ्याचे टाके.

कोळेश्र्वर पठार कडे जाताना.

कोळेश्र्वर पठार 

YSM घनदाट जंगलात उन्हाच्य झरोक्यात
कोंडवळे मुर्हा कत्रट आजोबांचे गाव. अगदी १० घरे आहेत.







सुंदर अश्या पठारावर चालताना गावकऱ्यांच्या माळ्यातून जाताना.



कुंबळजाई देवीचे मंदिर


हाच खिंडीतून येणारा १२ माही जीवंत झरा. ह्याचाच पाण्यावर गावकरी जगतात


कात्रट आजोबा आमचे वाटाड्या.




ह्या किड्याचे नाव माहीत नाही पण कोळेश्र्वर मंदिराच्या आधीच प्रत्येक झाडावर हे किडे खूप प्रमाणात दिसले आणि ते अश्या रित्या पूर्ण सुकलेले आणि पापुद्रे जसे च्या तसे. 



कोळेश्र्वर मंदीर.


आता परत थोडे उलटे चालत येऊन पठाराच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे पश्चिम दिशेला महाबळेश्वर च्या बाजूला जोर च्या दिशेने जाताना. 



कात्रट आजोबा आम्हाला जोर गाव दाखवताना. ह्याच जागेला कोंडवळ पठार म्हणतात. 

खाली आल्यावर जोर गावात.



कुंभळजाई देवीचे मंदीर जोर गाव. 


गणेश घाट दिशेने जाताना. जोर गावाच्या वेशीवर.

गणेश घाट प्रारंभ गड्या सावकाश चालव....

मध्यात येताना..

समोरचे कोळेश्र्वर पठार आणि सिद्धू गणेश घाटाच्या शेवटच्या टप्प्यात.

सापडलेले पाण्याचे टाके.

गणेश घाटाच्या प्राचीन पायऱ्या.

गणेश घाटाच्या वर आल्यावर सुंदर अशी गणेशाची मूर्ती

जोर गावातले गावकरी दररोज ह्या घटने वर येतात आणि खाली पण जातात.

श्री क्षेत्र महाबळेश्वर पठारावर.

संपूर्ण कोळेश्र्वर पठार गणेश घाट वरून.


समाप्त








5 comments:

  1. आलोक मस्त!लिहीत रहा!����

    ReplyDelete
  2. निसर्गासारखा नाही रे सोयरा
    त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन
    उजळते जग क्षणकाली
    स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त
    पुन्हा मूळ वाट पायाखाली

    ReplyDelete