Sunday, March 1, 2020

एक अनोखा रेंज ट्रेक - भाग २

एक अनोखा रेंज ट्रेक


कसा वाटला तुम्हाला मागचा ब्लॉग ??? नक्की सांगत रहा मला, कॉमेंट मध्ये तुमचे अभिप्राय नक्की लिहीत जवा, म्हणजे मला पण समजेल कसा लिहीत आहे ते. तर मग आता तर खरी मोहीम चालू होईल. 

जसे मी मागे सांगितले त्याप्रमाणे एक गाडी ट्रेक संपेल तिथे लाऊन लोक परत आलेले. वेळ जास्त घालवून चालणार नव्ह्ते कारण गड जरी समोर दिसत असला तरी गडावर अंधाराच्या आत पोचायचे होते. त्यामुळे आम्ही लगबगीने निघायच्या तयारीला लागलो. मस्त एक ग्रुप फोटो काढला. आम्ही एकूण ११ जण होतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो आजही असे साथीदार मिळणे म्हणजे फारच खास. कुठे शनिवार - रविवार ट्रेकला जायचे, झोपा घरीच. कामाचा ताण असो वा रात्री झोप उशिरा झाली असो सगळे वेगळ्या उत्साहाने हजर होतो. 

अश्या तर्हेने सकाळी ९:१५ वाजता आम्ही  केट्स पॉईंटच्या इथून छोट्या निमुळत्या गल्ली मधून उतरायला सुरवात केली. एका पाठीमागे एक. एका छोट्या घळीमधुन आमचा ट्रेक चालू झाला. छोट्या छोट्या पायऱ्या होत्या. घळीचे तोंड हळू हळू मोठे होत जात होते. थोडे कड्याच्या खाली आल्यावर मस्त मोठी ledge (कड्याच्या खाली उभे राहायला असलेली जागा), तिथे छोटे पाण्याचे टाके पण आहे. हळू हळू कड्याच्या बाजूने आपण खाली येत जातो. शेजारी खाली दिसणारा बलकवडी धरण प्रकल्प, आमच्या डाव्या हाताला दिसणारे महाबळेश्वरचे तशील कडे एका मागोमाग एक दिसत होते आणि बलकवडी धरणाच्या वर कमळगड व कोळेश्र्वर पठार सुंदर दिसत होते. थोडे पुढे आल्यावर आम्ही हत्ती सरख्या दिसणाऱ्या केट्स पॉईंटच्या तोंडाच्या भगा खालून जात असताना तो कातळ इतका सुंदर दिसत होता. माझ्या तो एका फोटोत मावेना. सगळ्यांनी मस्त फोटो काढून पुढच्या प्रवासाला लागलो. जसे जसे जात होतो तसे तसे खालचे गाव जवळ येत होते आणि वरचा कडा मोठा वाटणारा निमुळता होत जात होता. गप्पा टप्पा करत, थोडे थोडे थांबत आम्ही जात असताना माझा पाय एका ठिकणाहून सटकला आणि मला सावरायला वेळ मिळाला नाही त्यात पाठीवर २ दिवसाचे ओझे, सरळ येऊन हात कोणत्या काटेरी झुडपावर घासत गेला समजले नाही पण उठलो तेव्हा तळहाताला मोठे खोलवर कापले गेले. माझ्या बुटाच्या ब्रँड वरून परत शिव्या पडल्या. चांगलेच रक्त वाहू लागले. थोडे खाली उतरून विजय गुर्जरनी मस्त तेल ओतले. पुढच्या गप्पा गोष्टी करत कसा वेळ गेला समजले नाही. मजल दरमजल करत एकदाचे आम्ही खाली गावात आलो. जिथे आपल्याला रस्ता लागतो ते गाव म्हणजे वैगाव/वायगाव. 

या ठिकाणी थोडी विचारपूस केली असता तुम्हाला गावकरी लगेच सांगतात. विचारात विचारात आम्ही कमळगड पायथ्याच्या असलेल्या परतवडी, नांदगणे गावात येऊन पोचलो. रस्त्यात मस्त आम्ही स्ट्रॉबेरीच्या मळ्यात गेलो, खूप स्ट्रॉबेरी खात खात आलो, कृष्णा नदीचे मस्त धरणातून सोडलेले स्वच्छ पाणी प्यायलो, मन तृप्त झाले. गावात छान पैकी दुपारचे जेवण केले आणि जरा आराम केला. अर्धा तास छान आराम, गप्पा गोष्टी करून गडाकडे जायच्या मार्गाला लागलो. 

एका मागोमाग एक गडाच्या दिशेला चालायला लागलो. ह्या मार्गावर खूप कमी सावली मिळते. उन्हाने आमची जरा जास्तच परीक्षा पहिली. वरून पडणारा उन्हाचा सरळ फटका आणि खालून जमीन आणि वाळलेले गवत अश्या काय पद्धतीने आमचा कास पाहत होते. तरीपण एकमेकाला आधार देत, खडी चढण संपवून वरती जंगलात पोचलो. कोणीपण एकमेकांना सोडून एकटे पुढे गेले नाही, सगळे एकमेकांना घेऊन बरोबर चालले होते. सिद्धू सारखा मुरलेला ट्रेकर, सायकलिस्ट आणि रनर त्याला त्रास झाला पण प्रशांत दादा, विजय ह्यांनी त्याची साथ सोडली नाही. सगळे सावली शोधून त्याचसाठी थांबले होते. ह्या मार्गावर नुसतं गवतच आहे, सावली खूप वरच्या भागात मिळते. त्यामुळे शक्यतो हा भाग दुपारचा टाळावा. थोड्या वेळात सगळे ठीक झाल्यावर, पाणी आणि एनेर्जी ड्रिंक्स पिऊन आम्ही शेवटच्या टप्प्याला लागलो. थोड्याच वेळात आम्हाला घनदाट जंगल लागले, सगळा थकवा झटक्यात गेला. गार आणि घनदाट जंलातून जाताना इतकं छान वाटत होते. वाट पाहत पाहत आम्ही कमळगडाच्या दिशेने जात होतो. 

पाहता पाहता आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या श्री गोरक्षक मंदिरापाशी येऊन पोचलो. मस्त आराम केला, आणि कमळगडाच्या दिशेने निघालो. गड फार लांब नव्हता. पण जंगल इतके घनदाट आहे की त्यामुळे दिशेचा अंदाज येत नाही. मंदिरापसून थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला जीवंत झऱ्याचे टाके आहे. काही पोरांनी नुकतेच टाके साफ केले होते, त्यामुळे पाणी जरा कमी होते टाक्यात. टाके पाहून आम्ही पुढे निघालो आणि १०-१५ मिनिटातच आम्ही गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. तिथे शंकर डोईफोडे ह्यांचा घराच्या बाहेर आम्ही आमच्या बॅग ठेवल्या आणि आम्ही गडावर गेलो. लगबगीने पावले टाकत आम्ही गडावर जायला निघालो. गड हा ताशील कड्यांनी थाटात उभा आहे. गडाला तटबंदी नाही, पण एक मुख्य दरवाजा असावा असे मला वाटले जेव्हा गडाच्या खाली शिडीच्या आधी एक तटबंदीचे अवशेष आहेत. तटबंदी ओलांडून आपण गडवराती जाण्यासाठी असलेल्या शिडीपाशी येतो. २ मोठ्या दगडांच्या मध्ये शिडी आहे. एकावेळी शक्यतोवर एकानेच जावे. कारण, एका वेळेस एक जण जाईल इतकीच जागा आहे. गडाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्वाचा मुद्दा आहे. छोटेसे पटांगण असावे तसा गड पाठरासरखा आहे. 
गेरूची विहीर
गडाच्या मधोमध कातळात लांबलचक आयताकृती खोल खड्डा केला आहे, त्याला पायऱ्या पण आहेत खाली उतरायला.
केकच्या मधोमध छोटा चौकोनी खोलवर काप घेतला तर जसा दिसेल अगदी तसेच गेरूची विहीर आहे. खाली पोचलेला माणूस मुंगी इतका छोटा दिसावा इतकी विहीर खोलवर आहे. खाली उतरायला सरळ पायऱ्या आहेत. खोलीची थोडी भीती वाटू शकते पण घाबरु नये. आता धरायला दोर लावला आहे. शेवटच्या पायऱ्या थोड्या निसरड्या आहेत पण पाणी नसेल तर खोलवर जाऊन यावे. खूप थंड आहे विहीर, चक्का तापलेल्या शरीरातून वाफा बाहेर पडतात. संपूर्ण विहीर गेरू दगडाची आहे. परत येताना पायऱ्या छातीवर नाही डोक्यावर आहेत. 

वर आल्यावर पाहतो तर उंच भगव्याच्या बाजूने महाबळेश्वर पठाराच्या पाठीमागून सूर्य विश्रन्ती घेत होता. मस्त फोटोसेशन झाले. सगळे सुर्यास्त पाहून राहायच्या जागी यायला निघालो. गडाच्या वरून बराच लांबचा प्रदेश दिसतो. गडाच्या पश्चिमेला महाबळेश्वर पठार दिसते आणि दोघांच्या मध्ये कृष्णा नदीचे पात्र आहे . गडावरून पांडवगड, रायरेश्वर, म्हातारीचे दात किवा नवरा - नवरी कातळ दिसतात.

डोईफोडे काकांनी त्यांच्या मोठ्या घराच्या मागे पत्र्याच्या खोलीत आम्हाला राहायला जागा केली होती. प्रत्येकानी आपापले सामान नीट लाऊन घेतले. वातावरणातला थंडावा अता वाढायला लागला होता, सगळ्यांनी मस्त आवरून घेतले आणि मस्त पाय पसरून निवांत पटांगणात गप्पा मारायला बसलो. 

गप्पा खूप रंगत गेल्या. हळू हळू अरुण सावंत सरीच्या बद्दलचे किस्से सांगायला सुरुवात झाली. हर्षलनी त्यांचे अनुभव इतके सुंदर सांगितले की मी त्यांना पाहिलेले पण नसताना ते डोळ्यासमोरून उभे राहिले. फारच भारी व्यक्तिमत्त्व. त्यानंतर चिन्मय किर्तने ह्याने खगोलशास्त्राच्या बद्दल ताऱ्यांची सुंदर माहिती दिली. हे चालूच असताना विजयने मस्त भजी तळून आणल्या होत्या, फार भारी ताव मारला. मग थोड्याच वेळात जेवण तयार झालेच. जेवायला गरमा गरम दाळ, भात, तांदळाची भाकरी, बटाटा - टोमॅटो आणि कांदा रस्सा. दिवसभराच्या चालण्याने जी भूक लागलेली त्यात गरमागरम जेवण, सगळ्यांनीच ताव माराला. थोडा वेळ गप्पा मारून सगळे पाठ टेकताच झोपी गेलो. 

क्रमशः 


केट्स पॉईंट वरून डाव्या हाताला महाबळेश्वर पठार मध्ये बालकवडी धारण आणि त्याच्या मागे कोळेश्वर पठार

केट्स पॉईंट पासून उतरायला सुरुवात केली तेव्हा


केट्स पॉईंटच्या खाली थोडे उतरून आल्यावर पाण्याचे टाके


कड्याला गोल फिरून पुढे जाताना सुंदर पाऊलवाट





कड्याच्या खालून पुढे जाताना शेजारी दिसणारे कोळेश्वर पठार

केट्स पॉईंटच्या खाली आणि त्याचा दिसणारा रौद्र कातळ 


वैईगाव / वायगाव कडे उतरताना 

वर दिसणारा केट्स पॉईंट
शेवटच्या टप्प्यात गावाकडे पोचताना

गावात पोचलो
शहरीकरणापासून बऱ्याच अंतरावर

कमळगडाच्या दिशेने पावले उचलताना


शॉर्ट कट

आजून नवीन शॉर्ट कट वर दिसत आहे ते कोळेश्वर पठार

चुकून घुसावे ते पण मळ्यात



कृष्णा नदीचे सुंदर पात्र

परतवडी गावाच्या कमानीतून आत जाताना 

छोटेसे  पण एक सुंदरसे स्वच्छ गाव



छानश्या विश्रांती  नंतर गडाकडे कूच करताना पहा किती कमी सावली आहे ते

तळपत्या उन्हात खडी चढण चढताना तुषार कोठावदे आणि हर्षल कुलकर्णी

चढाई जास्तच अंगावरची वाटली त्यात ऊन आणि तापलेली जमीन जास्त कस काढत होती

खडी चढाई चढताना छोटी विश्रांती घेताना हर्षल कुलकर्णी
सगळे एका मागोमाग एक खडी चढाई चढताना सगळ्यात पुढे प्रसाद देसाई
कमळगड जवळ येताना

शेवटच्या टप्प्यात जरा सावली मिळते तेव्हा ...

अखेरची चढाई

हे असे आहे पहा मगाशी पाठ लाल करणारे ऊन आणि आता पहा
आनंदी झालेले प्रसाद राजे

कमळगडाच्या दिशेने


कमळगडाच्या पठारावर पोचलो, श्री गोरक्षनाथ मंदिर

शेवटच्या टप्प्यात झाडीमुळे कमळगड आजूनपण दिसलेला नाही
कमळगड दिसला 

शंकर डोईफोडे ह्यांचे सुंदर घर
मावळतीचे  सुंदर सूर्य किरणे


तटबंदीचे अवशेष
गडावर जाण्यासाठी असलेली शिडी

२ मोठ्या दगडांच्या मधून गडावर जायची शिडी 

मुख्य द्वारातून गडावर प्रवेश करताना

गेरूची विहीर मध्ये उतरताना प्रशांत दादा

हळू हळू दोर धरून खाली जाताना प्रशांत कोठावदे 

अशी आहे विहीर मित्रहो

वरून दुसऱ्या बाजूने विहीर

सूंदर असा मावळतीचा सूर्य

गडावरून दिसणारे शंकर डोइफोडे ह्यांचे घर आणि नवरा - नवरी सुळके

तशील कड्यांचा कमळगड आणि मागे दिसणारा केंजळगड त्यामागे रायरेश्वर पठार

निवांत गार हवेचा आनंद घेताना आणि सुंदर असा मावळतीचा सूर्य पाहताना.

महाबळेश्वरच्या मागे सूर्य जाताना

रात्रीचे तारांगण आणि थंड हवा 


2 comments:

  1. खूपच छान लिहिला आहेस रे मित्रा..
    वाचताना सगळ्या घटना परत आठवल्या ..

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सिद्धू. लवकरात लवकर शेवटचा भाग लिहितो आता.

      Delete